योग – आयुष्यासाठी सर्वोत्कृष्ट अनुप्रयोग (अ‍ॅप) | Yoga – the best app for life

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

वेदांतात उल्लेख असलेले अंतिम सत्य आणि क्वांटम फिजिक्स मध्ये वर्णिलेले सार्वत्रिक ऊर्जा क्षेत्र (universal energy field), ह्यांची अनुभूती घेण्याचा योग हा उत्तम मार्ग आहे. वेदांताचे उदात्त आणि सूक्ष्म सत्याची अनुभूती योगाद्वारे अधिक स्पष्ट्पणे जाणवते. आपल्या अंतरंगाकडे घेऊन जाणाऱ्या प्रवासाचा हा आरंभबिंदू आहे.

योग ही व्यक्तिगत व समुदायासाठी सुद्धा आनंदाचे भव्य द्वार उघडणारी गुरुकिल्ली आहे – व्यक्तिगत पातळीवर तसेच समुदायासाठी सुद्धा. व्यक्तित्ववादी आणि आत्मकेंद्रित प्रवृत्तींमुळे येणारी व्यक्तिगत आणि सामायिक दुःखे योगाने नाश पावतात.

योगामुळे आरोग्य, ऊर्जा असे केवळ ऐहिक स्तरावरचेच लाभ होतात असे नाही, तर आपली चेतनासुद्धा उन्नत होऊ लागते आणि आंतरिक प्रज्ञेचे वर्धन होते, जी आपल्याला कामे तडीस नेण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. योगाने आपल्या कार्यात कुशलता येऊ लागते, त्यामुळे तणावग्रस्त न होता कसलीही परिस्थिती हाताळण्याची क्षमता येते.

प्रत्येक मूल जन्मतःच योगी असते. पूर्ण जगभरातली मुले वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत नैसर्गिकपणे अनेक योगासने आणि मुद्रा करीत असतात. बाळाच्या मनाची स्थिती आणि श्वासाची लय एखाद्या योग्यासारखीच असते. योगामुळे बालकासारखी ती मोहकता आणि निरागसता आपल्यातही फुलू लागते.

योगामुळे अगणित लोकांना कित्येक आजारातून बरे व्हायला मदत मिळाली आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे व्यक्तिमत्वात संपूर्ण समतोल साधला जातो; अनेक जटिल प्रवृत्ती बऱ्या होतात. आजच्या काळातील वर्तनशास्त्राचे विज्ञान ज्या समस्येवर उपाय शोधू पहात आहे, त्याचे समाधान योगात हमखास सापडेल हे वास्तव आहे.

लोकांना जसे ध्यानाच्या अनुभूतीची झलक मिळू लागते, तसे त्यांच्या आयुष्यात संपूर्ण परिवर्तन घडू लागते. आम्ही हे तुरुंगात सुध्दा घडलेले पाहिले आहे. कैदी पहिल्यांदा प्राणायाम सुरु करतात आणि तो करत असताना सहजतेने ध्यानात जातात. आणि त्यांच्या वागणुकीत महर्षि पातंजलीने जे यम व नियम सांगितले आहेत ते सहजगत्या दिसून यायला लागतात. योगामुळे अगदी अतिरेकी आणि कैद्यांना सुद्धा साधू आणि कवी बनविण्याइतपत जीवन कल्पनाही करवणार नाही इतक्या सुंदर तऱ्हेने बदलत आहे. आपले अंतःकरण मृदू होते, बुद्धी तीक्ष्ण होते आणि मनातला गोंधळ दूर होतो.

ह्या शतकात संपूर्ण जगाला नैराश्याच्या आजाराचे सर्वात मोठे आव्हान भेडसावत असताना, योग हा निःसंदेह असा अँप आहे जो प्रत्येकाने आपल्या आयुष्यात डाऊनलोड करायला हवा.

विज्ञान, क्रीडा आणि संस्कृती प्रमाणेच योगाचे शिक्षण आणि तत्वज्ञान ह्यांच्या भरभराटीसाठी योगालासुद्धा शासकीय पाठबळ मिळायला हवे. धर्मनिरपेक्ष पडद्याआड इतकी वर्षे योगाचे अस्सल महत्व सातत्याने नाकारले जात असताना, आता आपले आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्यामुळे त्याच्या प्रचाराला चालना मिळाल्याचे बघून उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

जेव्हा लोक आपल्या कामाच्या व्यापातही नियमित योगाचा सराव करतात, तेव्हा त्यांच्यात सुसंवाद स्थापन होतो, तसेच एककल्लीपणा आणि वाचाळपणा कमी होतो. जर सर्व राष्ट्रांच्या प्रमुखांनी योगाच्या मार्गावर चालण्याचे ठरवले तर जगभरात लवकरच शांतता प्रस्थापित करता येईल.

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>