जीवनाचा विस्मयकारक पैलू | The Wow Factor in Life

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

अज्ञाताबाबत भीती ही सामान्य मानवी प्रवृत्ती आहे. आपल्या मनातील कल्पनेप्रमाणे आपले जग चालते आहे की नाही हीच खात्री करून घेण्यात बहुतांश लोक सतत व्यस्त असतात. तथापि वास्तविकता अशी आहे की अज्ञाताचा स्वीकार केल्याशिवाय उन्नती होणे शक्य नाही.

जेव्हा आपण जीवनात गूढता किंवा विस्मयासाठी दारे बंद करतो तेव्हा आपण विकासाचा मार्ग तर रोखतोच पण तसे केल्याने नकळत आपले जीवन यंत्रवत बनत जाते. जसे अगोदरच निकाल माहीत असलेला खेळ बघण्यात काहीच मजा नसते, तसेच पूर्वनिर्धारित आयुष्यही कंटाळवाणे आणि यांत्रिक वाटू लागेल.


आयुष्य म्हणजे निश्चितता आणि अनिश्चितता यांचे मिश्रण आहे. ते विरोधी दिसत असले तरी त्यापैकी एक जरी नसले तर जीवन अधूरेच आहे. आपल्या आकलनाच्या मर्यादित क्षेत्रात एक भाग असा असतो जो काही गोष्टींबद्दल निश्चित असतो, तर दुसरा भाग अज्ञाताचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो हे करीत असताना बऱ्याच गूढ गोष्टी आपल्याला विस्मयचकित करतात.


जी व्यक्ती अनिश्चिततेला सामोरे जाण्याचे आणि त्याला हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करते ती खरी ज्ञानी. सततच्या बदलत्या जगाशी जुळवून घेत कुणी आरामात राहू शकत असेल तर तो किंवा ती सक्रिय प्रतिसाद देऊ शकेल आणि आयुष्यात येणाऱ्या अफाट संभावनांचा फायदा घेऊ शकतात.


आश्चर्यचकित होऊन अनिश्चिततेकडे पाहणे ही ज्ञानी व्यक्तीची रीत असते. विस्मय हीच मुळी नव्या ज्ञानाची सुरुवात असते. विस्मयाला खेचले की सृजन घडू लागते. “मला माहीत आहे” ही प्रवृत्ती व्यक्तीला बंदिस्त आणि मर्यादित करते. “मला माहित नाही” हा भाव नव्या संभावनांसाठी मार्ग मोकळा करतो. ‘मला सारे माहीत आहे’ असे जेव्हा एखाद्याला वाटते, तेव्हा ती व्यक्ती आपल्या ठराविक संकल्पनांतच अडकून राहते.

बहुतेकदा व्यक्ती निराशेतून ‘मला माहित नाही’ असे म्हणत असते. नकारात्मक भावनेतून उद्भवलेलं ‘मला माहित नाही’ ला विस्मयकारक ‘मला माहित नाही!’ जे अनंत शक्यता जाणून उत्पन्न होते त्यात परावर्तित करणे हाच उन्नतीचा मार्ग आहे. एखाद्याला जेवढे अधिक ज्ञान असते तेवढे अधिक अज्ञाताबद्दल विस्मयभाव त्यात उदय होतात. ह्याबद्दल उपनिषदामध्ये सुंदररीत्या उद्धृत केलेले आहे, “जो म्हणतो की मला माहित नाही, त्याला माहित असते आणि जो म्हणतो की मला माहित आहे, त्याला माहित नसते.” असे म्हटले जाते की, जेवढे ज्ञात आहे, ते अज्ञाताच्या हिमनगाच्या टोकाएवढेही नाही.

जे जुने आहे त्याबद्दल काहीच आश्चर्य नसते. जे नवं नाही त्याबद्दल निश्चितता असते. आयुष्य हे नव्या, जुन्याचे मिश्रण आहे. जो मनुष्य केवळ आश्चर्यच करीत असतो, तो हरविलेला आणि गोंधळलेला दिसतो. आणि जो सगळ्या गोष्टींसाठी अगदी निश्चिंत असतो, तो सगळे गृहीत धरू लागतो आणि सुस्त, निरस होऊ लागतो. जाणीवपूर्वक या दोन्ही गोष्टींचा स्वीकार केल्यास आयुष्यात रंगत वाढायला लागते. निश्चितता आणि विस्मयभाव या दोन्हीत संतुलन साधण्याची योग्यता असणे हे आयुष्यात उन्नतीचे लक्षण आहे.


जेव्हा मन अमर्याद गोष्टींना सामोरे जाते तेव्हा विस्मयभावाचा उदय होतो. मग विस्ताराची अनुभूती येऊ लागते. जेव्हा आपण आश्चर्यचकित असतो तेव्हा आपण गोष्टी वेगळ्या नजरेने पाहू लागतो आणि आपली निरीक्षणशक्ती तीक्ष्ण होते. ती आश्चर्याची भावना आपली काळाबद्दल संवेदना विस्तारित करते आणि आपण कार्यरत होत भूत, भविष्याची पर्वा न करता वर्तमानात पूर्णपणे रमून जातो.

ही महदाश्चर्याची भावना आपल्यात जागृती आणते, आणि जेव्हा आपण जागृत असतो तेव्हा आपण बघू लागतो की संपूर्ण जगत विस्मयांनी भरलेले आहे. ह्या सृष्टीच्या भव्यतेने कुणी विस्मयचकित झाला नाही तर त्याचे डोळे अजूनही उघडलेले नाहीत. जागृत अवस्थेत विस्मयतेने डोळे मिटले जातात, तेच ध्यान होय.

 
जे अस्तित्व आहे त्याला आपल्या जगाबद्दलच्या संकल्पनेशी काही देणं-घेणं नसते. ही सृष्टी म्हणजे एक अनाकलनीय रहस्य आहे – जेव्हा आपली ह्याबद्दल खात्री होते तेव्हा त्याचे गूढ अधिकच गहन होत जाते. ह्या सृष्टीच्या गूढतेला अधिक गहन करणे म्हणजे विज्ञान आणि आपल्या अस्तित्वाच्या गुढतेला अधिक गहन करणे म्हणजे अध्यात्म. जर विज्ञान तसेच अध्यात्म ह्या दोन्हीपैकी कशानेही तुमच्यात आश्चर्य निर्माण झाले नाही तर तुम्ही अजूनही गाढनिद्रेत आहात.

हा विस्मयभाव आपल्याला गहनतेने चौकशी करण्याची इच्छा जागृत करतो. आपल्या आयुष्याबद्दल अजून अधिक जाणून घेण्याच्या ह्या तीव्र तृष्णेशिवाय, मानवाने आज जी काही प्रगती केली आहे ती शक्यच झाली नसती. आपण जन्मतःच जिज्ञासू असलो तरीही आपण जीवनातल्या वास्तविक विस्मयभावापासून स्वतःला दूर ठेवले तर आपली नवे जाणून घेण्याची प्रवृत्ती कमी होऊ लागते. हा जिज्ञासूभाव परत जागृत करणे आपल्या यशासाठी महत्वाचे आहे.

केंद्रित आणि शांत मन, निरागसता आणि सम्यक भाव घेऊन येते – जो कोणत्याही ज्ञानाचा आरंभ आहे. म्हणूनच प्राप्त माहितीची पाटी कोरी करण्यासाठी नियमितपणे ध्यान करणे अतिशय महत्वाचे आहे. जेव्हा आपण विवेकाशिवाय बरेच प्रश्न विचारू लागतो तेव्हा जीवनातील अज्ञात गोष्टी उलगडण्यास सुरवात होते.

जे तुम्हाला खरोखरच जाणून घ्यायचे आहे त्याबद्दल आणि त्याच्याशी संबंधितच प्रश्न विचारा. ज्याचे उत्तर केवळ होय किंवा नाही असे देता येईल अशा प्रश्नांच्यापलीकडे चौकशी करा. मी बरोबर आहे तसेच मला माहित आहे, हा भाव त्यागत चला. जे तुम्हाला अद्यापही माहित नाही अशा दुनियेप्रती विस्मयचकित व्हा. प्रापंचिक जगापलीकडे असे मोहकता आहे. जे आपण पाहिले किंवा कल्पिले आहे त्यापलीकडे अज्ञात जगत आहे. आपले डोळे बंद करा, ध्यान करा, मन शांत करा आणि विस्मयाच्या गहनतेत उतरा!


विस्मयभाव हीच योगाची, एकरूप होण्याची पहिली पायरी आहे. आश्चर्य चकित व्हा जे आश्चर्य तुम्हीच आहात !

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>