महात्मा गांधींकडून अज्ञात शिकवण | Unknown Lessons from the Mahatma

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

आपण गांधीजींच्या कडून काय शिकू शकतो हे पाहण्याची गांधी जयंती एक संधी आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन आपण काय काय करावं आणि काय करू नये याची सतत शिकवण देत असते. त्याग-भाव, सर्वांचा स्विकार, सत्संग यावर अतूट श्रद्धा, देशाच्या प्रगतीसाठी सतत झटत राहण्याचे लक्ष्य आणि समाज कल्याण यासारखे गांधीजींचे आदर्श आपल्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. परंतू त्यांच्या जीवनात काही असे पैलू देखील होते जे आपण काय करू नये याची शिकवण देतात.

माझे शिक्षक पंडित सुधाकर चतुर्वेदी, जे ११८ व्या वर्षी देखील हयात आहेत, ते बहुतांश कालावधी गांधीजींच्या सोबत राहिले होते. ते बंगळूरू वासी असल्याने गांधीजी त्यांना ‘बेंगलोरी’ म्हणून हाक मारत, ते गांधीजींना भगवत गीता शिकवत. कस्तुरबा गांधींचे निधन झाले त्या दिवशी ते दोघे येरवडा जेलमध्ये होते. त्यांना मृत्यूशय्येवर पाहून गांधीजी म्हणाले, “बेंगलोरी आज तुझ्या बापूची अग्नि परीक्षा आहे.” पंडितजींनी पहिल्यांदा बापूंच्या डोळ्यात अश्रू पहिले. गांधीजींनी कस्तुरबांना गीतेतील दुसरा अध्याय वाचून दाखवला, मग त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गांधीजी म्हणाले, “मी हिला खूप दुःख दिले आहे आणि काही सुख दिले नाही याची मला जाणीव आहे.” कस्तुरबांनी त्यांच्या कार्यामध्ये शेवटपर्यंत साथ दिली होती. जर त्यांनी कधी कधी कस्तुरबांच्या काही इच्छांना मान देऊन पूर्ण केल्या असत्या तर त्यांना इतका पश्चाताप वाटला नसता.

जेंव्हा त्यांच्या मुलाने धर्मांतर केले तेंव्हा गांधीजींना आत्यंतिक दुःख झाले. ते धर्मांतराच्या विरोधात खूप काही बोलले आणि पश्चाताप दग्ध होऊन त्यांनी मान्य केले की ते आपल्या मुलाला योग्य मुल्यांची शिकवण देऊ शकले नाहीत आणि आपल्या धर्माचा सन्मान करायला शिकवू शकले नाहीत. त्यांना राष्ट्रपिता म्हणून सन्मान प्राप्त झाला असला तरी ते आपल्या मुलांचे योग्य पिता बनू शकले नाहीत. साऱ्या देशाच्या स्वातंत्र्याची इच्छा बाळगणारे आपल्या पत्नीला स्वातंत्र्य देऊ शकले नाहीत. आपल्या हट्टापोटी गांधीजींनी आपल्या कुटुंबाला अतिव दुःख दिले तसेच त्यांची स्वतःची मुले विद्रोही झाली. जीवनाच्या सर्व पैलूंना एकाच तराजूत तोलणे योग्य नाही. वेगवेगळ्या परिस्थिती आणि व्यक्तींसाठी वेगवेगळे मापदंड वापरणे गरजेचे असते.

फाळणीच्या वेळी गांधीजींना दंग्याच्या बातम्या समजत होत्या परंतू गांधीजींनी त्या हिंसेवर विश्वास ठेवला नाही. परिस्थिती समजून घेण्यासाठी तिकडे बेंगलोरीला धाडले, तेथे त्यांच्यावर सातवेळा चाकू हल्ला झाला. एकदा तर त्यांना गळयापर्यंत वाळूत गाडले होते. लोकांनी मारण्यापूर्वी मुल्ला त्यांना पहिला दगड मारणार होता. इतक्यात सेना तेथे पोहोचली आणि त्यांचा जीव वाचला. हा अनुभव त्यांनी गांधीजींना सांगितला आणि जखमा दाखवल्या तर उलटे गांधीजींनी त्यांच्यावर आरोप लावला कि, “तू हिंदू आहेस म्हणून हे सर्व सांगत आहेस. माझे मुस्लीम बांधव असे कधीही करणार नाहीत.” आपल्यावर होणाऱ्या अशा आरोपांनी हताश होऊन बेंगलोरी गांधीजींना सोडून निघून गेले. नंतर तिसऱ्या दिवशी गांधीजींची हत्या झाली. पंडितजी मला म्हणायचे की, “त्या वृद्ध व्यक्तीला त्यांच्या शेवटच्या तीन दिवसामध्ये मी सोडून आलो.” हा पश्चाताप त्यांना आयुष्यभर राहिला.

माझे आजोबा देखील सेवा आश्रम मध्ये गांधीजींच्या सोबत बारा वर्षे होते. तेथे एक नियम होता की जेवणातील सर्व पदार्थांसोबत, मग ती गोड खीर असेना का, त्यासोबत कडूनिंबाची चटणी खावी लागे. लोकांचा स्वादाचा मोह नाहीसा होण्यासाठी ही एक तपश्चर्या होती. ही सवय संन्याश्यासाठी ठीक होती पण सर्वांना बळजबरीने तसे करायला लावणे योग्य नव्हते. अगदी लहान लहान मुलांना देखील या नियमाचे पालन करावे लागे.

गांधीजी आपल्या विचारांबाबतीत अत्यंत ठाम असायचे आणि त्यांचा निर्णय मानणे सर्वांसाठी अनिवार्य होते. सर्वांचे म्हणणे ऐकून परिस्थितीनुरूप योग्य अयोग्य निर्णय घेणे हे त्यांच्या कार्यपध्दतीत नव्हते. खूप वेळा असे देखील झाले आहे की कोणत्याही योग्य कारणाशिवाय इतरांनी आपले म्हणणे ऐकावे यासाठी दबाव टाकण्यासाठी ते व्रत करू लागत. कॉंग्रेसमध्ये हा मुद्दा उठला की भारताचे पहिले पंतप्रधान कोणाला बनवावे, तेंव्हा एक सोडून सारी मते सरदार पटेलांना मिळाली. या निर्णयानंतर देखील महात्मा गांधींनी पंतप्रधान पदासाठी जवाहरलाल नेहरूंचे नांव घोषित केले. ज्या व्यक्तीने आपल्या लोकशाहीचा पाया रचला तीच व्यक्ती त्यांच्या जीवनात कित्येक प्रकारे लोकशाहीच्या विरुध्द वागायची.

महात्मा गांधींनी पूर्ण जगावर कधीही न पुसता येईल अशी छाप पाडली आहे. जेंव्हा महायुध्द होत होते तेंव्हा ते अहिंसे बद्धल प्रतिबध्द होते आणि त्यागपूर्ण जीवन जगून देशाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांचे जीवन विविध रीतीने सर्वांसाठी एक धडा राहील.

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>