वैश्विक विचार वैश्विक बोल | Think Global, Talk Global

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

जागतिकीकरणाच्या या युगात भारतीय नेत्यांना जागतिक मंचावर बोलण्यासाठी सतत निमंत्रित केले जाऊ लागले आहे. म्हणून आपल्या राजकीय नेत्यांनी स्वतः तयारी करून जागतिक दृष्टीकोणातून आपले विचार स्पष्टपणे मांडणे गरजेचे झाले आहे.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपले विचार मांडताना जागतिक विषयाला अनुसरून बोलणे उत्तम. आपल्याच राष्ट्रवादाचे गोडवे गात बसल्यास श्रोते दुरावू शकतात शिवाय इतर देशातील नेतेही तेच करण्यास उद्युक्त होतील. असे होऊ लागले तर प्रत्येकाचे इतरांकडून कौतुक होण्याऐवजी जो तो आपलेच तुणतुणे वाजवत बसेल. समजा भारतीय नेता जर आपली भारतीय संस्कृती किती थोर आणि संपन्न आहे, याचे तुणतुणे वाजवत बसला तर इतरांच्यात देखील स्पर्धात्मक राष्ट्रप्रेम उफाळून येऊन त्यांची मनापासून भारताचे कौतुक करण्याची इच्छाच नाहीशी होईल.

उदाहरणाखातर, जर एखादा जर्मन किंवा ब्रिटिश नेता भारतात आला आणि केवळ आपल्याच देशाची थोरवी गाऊ लागला तर भारतीय श्रोत्यांना परके वाटेल आणि त्या नेत्याच्या विचारांना ते दाद देणार नाहीत. तसेच जर भारतीय नेता विदेशात जाऊन केवळ भारतीयत्वाबद्दलच बोलत राहिला तर तेथील श्रोत्यांनाही परकेपणा वाटेल. अश्या राष्ट्रप्रेमाच्या उघड प्रदर्शनाचे प्रतिकूल परिणाम होऊन ते भारताकडे आकर्षित होणार नाहीत.

आपल्या राष्ट्रीयत्वाशी निगडीत मुद्द्यांवर आपल्या नेत्याकडे पॅन इंडिया अजेंडा असणे गरजेचे आहे मात्र आंतरराष्ट्रीय श्रोत्यांना संबोधित करताना आपल्या नेत्यांकडे जागतिक दृष्टीकोन असणे गरजेचे आहे. सध्या विविध देशांतील आणि संस्कृतीतील जनतेशी आपलेपणा रुजवण्याची खूप गरज आहे आणि याची खूप कमतरता जाणवत आहे, आपण पाहिले आहे की निव्वळ आपल्याच राज्याबद्दल बोलणारा नेता राष्ट्रीय पातळीवर प्रभावी ठरत नाही. म्हणून “भारताच्या विचारधारा” ठळकपणे मांडताना देखील त्या जागतिक दृष्टिकोनाशी साम्य असणाऱ्या हव्यात. त्यासाठी स्वतःला जागतिक नागरिक बनवणाऱ्या विस्तारित सजगतेची गरज असते. जेंव्हा वसाहतवाद आणि जुलूमशाही प्रचलित होती तेंव्हा राष्ट्रीयत्वाची भावना जागविणे योग्यच होते. देशभक्ती आणि राष्ट्रीयत्व हे सकारात्मक गुण असले तरी त्याचे राजरोस प्रदर्शन हे व्यक्तीचे मर्यादित संदर्भातील जीवन दर्शविणारे आहे आणि वसुधैव कुटुंबकम् या प्राचीन आणि वैश्विक विचारधारेला अनुसरून नाही.

नेहमी काहीजण विचारतात की देशभक्ती ही सार्वभौमिकतेच्या विरोधात आहे कां? मला वाटते की, ते तसे नाही. मात्र देशभक्तीचे अति प्रदर्शन त्या व्यक्तीची सार्वभौमिकता झाकोळून टाकेल. तरीदेखील एकात्मता, विश्वात्मकता ही संकल्पना राष्ट्रीयत्वाच्या विरोधात नाही. राष्ट्रभक्ती आणि विश्वप्रेम हे परस्पर विरोधी नाहीत मात्र त्यांचे प्रकटीकरण कुशलतेने करणे गरजेचे आहे.

जेंव्हा आपली चेतना अधिक विस्तारित होते तेंव्हा आपली जगताशी असलेली आत्मीयता आणखी वाढते त्याचवेळी आपल्यामध्ये वैराग्य देखील जागृत होते, हे विचित्र वाटत असले तरी सत्य आहे.

 

 

 

 

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>