तेलंगणा – फुट टाका आणि शासन करा? | Telangana – Divide and Rule?

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

भारत वैशिष्ट्यपूर्ण आहे – सांस्कृतिक, धार्मिक आणि भाषिकतेमध्ये बेसुमार वैविध्य असणारा या पृथ्वीवरील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. असे असून देखील गतकाळामध्ये युगोस्लाव्हियन आणि सोव्हिएत देश ज्याप्रमाणे विभागले गेले तसे न होता हा देश अजूनही एकसंघ आहे हा चमत्कारच म्हणावा लागेल. आपल्या पूर्वजांनी प्रशासन आणि संपर्काच्या सोयीसाठी देशाला सूज्ञपणे भाषिक स्तरावर विभागलेले आहे. तरीही विशाल लोकसंख्या आणि दीर्घ भौगोलिक अंतरामुळे बऱ्याच राज्यांना परत विभागणे भाग पडले. वर्तमान परिस्थितीत तेलंगणाबाबत हा असाच पेच निर्माण झाला. तेलंगणाची परिस्थिती उत्तराखंडपेक्षा अत्यंत भिन्न आहे. उत्तराखंडला उत्तरप्रदेश मधून वेगळे करावे लागले, कारण टेहरी आणि गढवाल अशा डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना राजधानीच्या शहरात पोहोचायलाच दोन दिवस लागत होते जेथे बहुतांशी प्रशासकीय कार्यालये होती. म्हणून उत्तराखंडच्या लोकांसाठी वेगळे राज्य करणे योग्य होते, जेणेकरून प्रशासन अधिक कार्यक्षम आणि संपर्क अजून प्रभावीरित्या होऊ लागला. परिणामी त्या भागातील अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना मिळाली. राजधानीपासून शहरे आणि गावे जितकी दूर असतील तितकी ती अधिक दुर्लक्षित राहतात. इतके, की काही बाबतीत प्रशासनाचा पूर्ण अभाव दिसून येतो.

बिहार बाबतीत असेच घडत होते, जेथे सध्या झारखंडमध्ये असलेल्या दूरवर पसरलेल्या भागांत अधिकाऱ्यांची नियुक्ती म्हणजे शिक्षा समजली जायची. उत्तम प्रशासनासाठी आणि विकासासाठी झारखंडची निर्मिती अगदी क्रमप्राप्त्य होते. छत्तीसगडचे देखील असेच होते. छत्तीसगडच्या लोकांना वेगळे व्हायचे होते. आणि मध्यप्रदेश सरकारने ती मागणी स्वीकारली कारण भोपाळवरचा बोजा त्याने कमी होणार होता. हेतुपुरस्सर नसले तरीही पायाभूत सुविधांच्या अभावी बऱ्याच राज्यांच्या सीमेवरील जिल्ह्यांपर्यंत पोहोचणे अशक्य असते आणि मग तेथील सुविधा दुर्लक्षित राहतात. यामुळे दूरवरच्या जिल्ह्यांत वाढणारा असंतोष रोखण्यासाठी कर्नाटकाने सुद्धा आपली राजधानी काही महिन्यांसाठी बेळगाव इथे हलविली. येथील लोकांचा कल महाराष्ट्राला जाऊन मिळण्याचा होता.

Telangana2तेलंगणाच्या समस्येकडे नजर टाकल्यास येथे पूर्णपणे विपरीत परिस्थिती आहे. येथील राजधानीचे शहर हैद्राबाद हे तेलंगणात आहे आणि सर्व गुंतवणूक आणि विकास येथेच केंद्रित झालाय. संपूर्ण राज्याची एक तृतीयांश अर्थव्यवस्था राजधानीच्या शहरावर आधारित आहे. अशी परिस्थिती असताना आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीत किंवा रायल सीमा प्रांतात राहणाऱ्या लोकानीं उत्तम प्रशासनासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करायला हवी होती. हे दोन विभाग वेगळे होऊ इच्छित नाही. राजधानीतील लोकांना आंध्रप्रदेश बरोबर राहायचे नाही ह्यात काही तर्क दिसत नाही. शासनाला आपल्याच राज्यातील काही भूभागाचा त्याग करावा असे वाटते यात काही अर्थ नाही आणि दुसरीकडे नागालँडसारखी काही राज्ये ग्रेटर नागालँडच्या पूर्ततेसाठी इतर राज्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आपल्या राज्यात करण्याची मागणी करीत आहेत. लोकांना आंध्रप्रदेशचा भाग एकसंघ रहावासा वाटत असताना त्यांना दूर ढकलणे पूर्णपणे विसंगत वाटते. जर निझाम जिवंत असते तर त्यांला आपल्या राज्याचे क्षेत्र आकुंचित करण्यापेक्षा ते अजून मोठे करण्यात आनंदच वाटला असता. बहुदा एकत्र परिवारातून मुलांनाच वेगळे व्हावे असे वाटत असते. पण येथे वडीलच मुलांना दूर ढकलत आहे, कोणत्या फायद्यासाठी? वेगळे करण्याच कारण म्हणजे मतांचे राजकारण त्याशिवाय इतर काही स्पष्ट कारण दिसत नाही.

तेलंगणाची मुख्य तक्रार हीच आहे की सिमांध्रचे लोक राज्यातील जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर आपले वर्चस्व राखून असतात. राज्याच्या राजकीय किंवा आर्थिक पटलावर कार्य करण्यास तेलंगणाच्या एकाही व्यक्तीला कधीही रोखण्यात आले नव्हते. गुणवान आणि कठोर परिश्रम करणारे कोठेही असले तरी नेहमीच लक्ष वेधून घेतात, जसे गुजराती, पारसी, जैन आणि मारवाडी जवळपास सर्वत्र आपले वर्चस्व गाजवत आहेत.

थोड्याफार प्रमाणात अविकसित भाग सगळीकडे असतात. सर्वांना सारख्या संधी उपलब्ध असूनही हैद्राबादमध्ये झोपडपट्टीचे भाग आहेतच. अशा समुदायाच्या उत्थानासाठी कालमर्यादीत आरक्षणाचे पॅकेज देऊन अशा तक्रारी दूर करता आल्या असत्या. सरतेशेवटी, एकंदरीत त्रयस्थाला विभागणी मागचे कारण काय हे कोडेच राहील. पूर्ण आंध्रप्रदेशांत भाषा आणि संस्कृती एकच असताना, हे विभाजन कसे कार्य करेल हे पाहणे बाकी आहे कारण येथे एका भागातील लोकांची दुसर्‍या भागात अशी खुप सरमिसळ झालेली आहे.

एक प्राचीन संस्कृत म्हण आहे,

“यो वै भूमा तत् सुखम्, ना अल्पे सुखम् असती”

जे विशाल आणि थोर असते, त्यातच आनंद असतो, लहान असण्यात काहीच आनंद नाही.

केवळ काही भागातील लोक आपले प्रभुत्व गाजवतात म्हणून त्यांना दूर लोटण्याने काहीही साध्य होत नाही. कोणत्याही भागाचा दीर्घकालीन विकास केवळ शिक्षण आणि सशक्तीकरणामुळे घडू शकेल, विभाजनाने नाही.

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>