कर्माची गती न्यारी | Strange Are the Ways of Karma

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या विश्व सांस्कृतिक महोत्सवाचे प्रमुख आकर्षण होते कलाकारांची अढळ प्रतिबध्दता. सर्वसाधारणपणे कलाकार भिजलेल्या तसेच खराब स्टेजवर प्रदर्शन करण्यास तयार होत नाहीत. पण या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी सारे कलाकार भिजले होते तरीदेखील पूर्ण प्रतिबध्दतेने आपली कला सादर करत होते. या कार्यक्रमामध्ये ही त्यांची तपश्चर्या होती. संपूर्ण जगभरातून आलेले कलाकार, जे स्वतःच्या खर्चाने दूर दूर वरून आलेले होते, भले ही त्यांच्या नृत्य-संगीत सादरीकरणासाठी काही मिनिटांचा वेळ दिलेला असला तरी आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी तासंतास वाट पाहत थांबले होते. कलाकारांच्या अति उत्साही मागणीप्रमाणे साऱ्या देशांतून आपला कार्यक्रम प्रदर्शित करण्यासाठी आलेल्या सर्वांना सादरीकरणासाठी संधी मिळावी यासाठी विश्व सांस्कृतिक महोत्सवाच्या संयोजकांची तारांबळ उडत होती.

कॉस्मिक रिदम डान्स ड्रामा मधील सुमारे ४६०० नर्तकांनी केवळ एकदाच सामूहिक सराव करून देखील अद्भुत ताळमेळ राखत ३० प्रकारची नृत्ये सादर केली. या सुंदर प्रदर्शनाचा सराव कित्येक महिने निव्वळ व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे केला गेला होता.

 

अनोखी आव्हाने | Unique Challenges

सर्व कार्यक्रमांना वेळ देणे, २५०० धार्मिक नेत्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या विविध गरजांची काळजी घेणे सोपे काम नव्हते. एका धार्मिक समुदायांच्या मौलवींनी निक्षून सांगितले की संगीत वाजणार असेल तर ते स्टेजवर येणार नाहीत. मग आम्ही तासभर कोणताही संगीत कार्यक्रम न ठेवता फक्त चर्चा आणि भाषणे ठेवली.

 

या उत्सवामधील सहभागींचा उत्साह अचंबित करणारा होता. १९ मार्च, २०१६ रोजी बेंगलुरूच्या ५० वाद्य वृन्दासह असलेल्या सुमारे २००० वीणा वादकांना संधी द्यायची होती. परंतू आयोजनातील काही समस्यांमुळे आम्ही ती देऊ शकलो नाही.

 

उत्सवाच्या समारोपानंतर जगभरातील अनेक देशांनी आणि सरकारांनी विनंती केली आहे की असाच कार्यक्रम त्यांच्याही देशात आयोजित करावा.

 

संभाव्य दहशतवादी हल्ल्याबद्दल सर्वांना सतर्क केले गेले होते. पांच अनोळखी लोक आमच्या कार्यालयात आले आणि म्हणू लागले कि आम्ही इंटलिजेंस अधिकारी असून आम्हाला ५० प्रवेशिका द्या जेणेकरून आम्ही सर्वत्र फिरू शकू. आमच्या प्रमुखांनी इंटलिजेंस ऑफिसमध्ये विचारले कि आपण अश्या पांच व्यक्तींना पाठवले आहे काय, तर त्यांनी नकार दिला, तोपर्यंत ते लोक गायब झाले होते.

 

काही राजकीय नेते विश्व सांस्कृतिक महोत्सवाच्या मैदानावर गुडांना घेऊन येऊन त्रास देतील अशी सुद्धा अफवा त्यावेळी पसरली होती. या अफवेला पुष्टी तेंव्हा मिळाली जेंव्हा राजनेत्यांच्या फूस लावल्याने काही शेतकऱ्यांना कॅमेरासमोर बोलावले गेले आणि धरणे धरायला लावले, पण त्या शेतकऱ्यांच्या तेथे जमिनीच नव्हत्या.

 

लोकांच्या येण्या जाण्यासाठी तात्पुरता पूल बनवण्यासाठी आम्ही भारतीय सेनेची मदत घेतली, याबद्दल देखील काही लोकांनी तक्रार केली. एखादे बालक विहिरीत पडल्यावर देखील भारतीय सेनेला पाचारण केले जाते. जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारीच असते. संरक्षण खात्याला पूल बनवण्यासाठी पाठवणे हा दिल्ली सरकारचा निर्णय योग्यच होता. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सरकारांनी देखील पूल बनवून घेतले होते.

 

त्या जागेवर विश्व सांस्कृतिक महोत्सव केल्याने त्या जागेची हानी होईल, असे काही तथाकथित ‘समाजसेवकांनी’ पसरवले असले तरी दिल्लीला या गोष्टीमुळे अनेक लाभ झाले आहेत. ईशान्य आणि दक्षिण भारतातून आलेल्या अनेकांनी तसेच वीस हजार विदेशी पर्यटकांपैकी अनेकांनी दिल्ली पहिल्यांदा पाहिली. इंग्रजी आणि अन्य भाषांमधून वेबकास्टच्या माध्यमातून प्रसारित झालेले थेट प्रक्षेपण सात लाख ठिकाणाहून १ अब्ज ८० लाख लोकांनी पाहिले.

 

एक अभियांत्रिकी चमत्कार | An Engineering Marvel

या सर्वामध्ये पाया नसलेले अवाढव्य स्टेज बनवून आम्ही एक अभियांत्रिकी चमत्कार दाखवला. आम्हाला अशा सूचना देण्यात आल्या होत्या कि जमिनीवर खड्डा पाडायचा नाही, मग आम्ही मेटलच्या प्लेटस् पाईपाना जोडून ४० फुट उंचीचे स्टेज बनवले.

 

पाया नसलेल्या स्टेजच्या कल्पनेवर काही इंजिनिअर्स आणि अधिकारी यांनी शंका व्यक्त केली. काही व्यक्तींना ही चेष्टाच वाटली. अगदी न्यायालयाला देखील वाटले की जमीन खोदल्याशिवाय असे स्टेज बनवले जाऊ शकत नाही. समारोह सुरु होण्यास आठ तास बाकी असताना आम्हाला पंतप्रधानांसाठी वेगळे स्टेज बनवावे लागले कारण त्यांच्या कार्यालयाला त्यांच्या संरक्षणाची काळजी होती. कोणत्याही नाविन्यपूर्ण कल्पक विचारांना प्रारंभी विरोध होतोच, हे समजून घेण्यासारखे आहे .

 

अनेक धडे शिकवणारी एक घटना | An event with many lessons

उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य कार्यकर्ते माझ्याकडे येऊन म्हणू लागले की हा कार्यक्रम यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये स्थलांतरित करूया कारण आज सायंकाळी देखील मोठा पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसात भिजल्याने एल ई डी लाईट्स आणि स्क्रीनमध्ये पाणी गेल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे होते की अद्याप ती जागा ओली आहे, चिखल झाला आहे आणि आपण त्यावर काहीही उपाय केलेला नाही. मला त्यांचे चेहरे चिंताक्रांत दिसत होते आणि ते मला समजावत होते की हा कार्यक्रम अश्या ठिकाणी करूया की जेथे १५००० लोक सामावतील.

 

मी केवळ हसलो आणि म्हणालो की कार्यक्रम तेथेच होईल. मी सर्वांचे मत ऐकूनच निर्णय घेतो, पण यावेळी मला माझ्या भूमिकेवर ठाम राहावे लागले.

 

काही क्षणात सर्वांची चिंता संपली आणि ते म्हणू लागले की आम्ही हे आव्हान स्विकारण्यास तयार आहोत. यानंतर तो एक महान कार्यक्रम पार पडला आणि निसर्गाने देखील आम्हाला पूर्ण साथ दिली. ही एक ऐतिहासिक घटना घडली ज्यामध्ये अनेकांना अनेक धडे मिळाले. जे कोणी हा कार्यक्रम अयशस्वी करू इच्छित होते त्यांना हा मोठा धडा मिळाला की सत्याचा सदा विजय होतो आणि जे काम स्वच्छ मनाने केले जाते त्या कामात हमखास यश प्राप्त होते.

 

तत्वाच्या पलीकडे | Beyond Matter

हा कार्यक्रम खूप मजेदार किस्स्यांनी भरलेला होता मग कार्यक्रमाचे स्थळ असो, राहण्याची सोय असो, सुरक्षा व्यवस्था असो, वाहन व्यवस्था असो की प्रवेश पास, पार्किंग, भोजन आणि महत्वाचे म्हणजे एवढ्या लोकांच्या बैठकीची व्यवस्था. पंधरा दिवसानंतर पर्यावरण तज्ञ आणि विद्वान डॉ. राकेश रंजन मला भेटण्यास आले त्यावेळी ते सांगत होते की जेथे विश्व सांस्कृतिक महोत्सव झाला त्या जागेवरच आदि शंकराचार्य यांनी “यमुना अष्टकम” लिहिले आणि तेथूनच चार धाम यात्रा सुरु केली होती आणि परिसराला अजूनही आश्रम म्हटले जाते यात काही योगायोग नाही.

 

प्रत्येक मूर्त गोष्टीमध्ये एक अमूर्त / अव्यक्त तत्व समाविष्ट आहेच. भौतिक जगत हे निमित्त /कारण आणि त्याचे तत्काळ परिणाम यावर आधारित आहे तर सूक्ष्म जगात, हे सूक्ष्म कर्मावर. आणि याचे आकलन करण्यासाठी उच्च स्तरीय बुद्धीची ज्ञानाची / गहन बुद्धिमत्तेची गरज असते. जेंव्हा हे ज्ञान आपल्यामध्ये येईल तेंव्हा कोणतीही गोष्ट आपणास विचलित करू शकणार नाही.

 

ताजा कलम | Postscript

वाईटात वाईट काय झाले असते? एन.जी.टी. (नॅशनल ग्रीन ट्रॅब्यूनल) ने आमचा कार्यक्रम थांबवला असता आणि मग बहुतेक आम्ही जगभरातील हजारो कलाकारांच्या सोबत राजपथवर पद यात्रा केली असती. वसुधैव कुटुंबकम् ची आमची घोषणा तशी देखील जगभर प्रसारित झालीच असती.

 

आजदेखील आर्ट ऑफ लिव्हिंग विरुद्ध षडयंत्र चालूच आहेत. ही बाब त्यावेळी आणखी स्पष्ट झाली असती आणि सर्व प्रसार माध्यमे आमच्या सोबत असती.

 

या उत्सवात अखेरपर्यंत एक गोष्ट सतत आढळली ते म्हणजे हजारो स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावरील कधीही न ढळणारे हास्य आणि आत्मविश्वास.

एकीकडे हे सर्व अविश्वसनीय होते आणि दुसरीकडे हेच अपेक्षित होते.

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>