महात्मा गांधींना आठवताना । Remembering Mahatma Gandhi

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी
महात्मा गांधींचा आमच्या परिवारावर आणि माझ्या बालपणावर गहिरा प्रभाव होता. माझे आजोबा (वडिलांचे वडील) साबरमती आश्रमात वास्तव्यास होते आणि त्यांनी गांधीजींची वीस वर्षे सेवा केली. माझी आजी आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेली आणि स्वेच्छेने आपले साडे दहा किलो सोन्याचे सारे दागिने आजोबांना देत म्हणाली, “मी मुलांची काळजी घेईन. तुम्ही जा आणि देशाची सेवा करा.”
माझे शिक्षक पंडित सुधाकर चतुर्वेदी हे महात्मा गांधींचेही शिक्षक होते, ज्यांनी त्यांना भगवद्गीता शिकविली होती. ते अजूनही जिवंत आहेत आणि त्यांचे वय ११६ वर्षांचे आहे. बंगलोरचे असल्याकारणाने गांधीजी त्यांना बंगलोरी असे संबोधत असत. एक वेळ ते पुण्यातील येरवडा तुरुंगात कैदेत होते आणि कस्तुरबा मृत्युशय्येवर होत्या. जेव्हा गांधीजींना जाणवले की ती आजचाही दिवस जगणार नाही, तेव्हा त्यांनी पंडित चतुर्वेदींना गीतेचा दुसरा अध्याय वाचायला सांगितला. त्यात एक श्लोक होता ज्यात स्थितप्रज्ञ – म्हणजे जो ज्ञानात स्थिर आणि केंद्रित झालेला आहे अशा व्यक्तीचे वर्णन केले आहे. गांधीजी म्हणाले, “बंगलोरी, आज तुमच्या बापूची कसोटी आहे. आज बघू या मी आपल्या मनाचे समत्व राखू शकतो की नाही. माझी धर्मपत्नी आणि माझ्या आयुष्याची गेल्या पन्नास वर्षापासूनची भागीदार आज आपले शरीर सोडत आहे. मी या बाईवर खुप अन्याय केला आहे. तिला जे करायचे नव्हते ते करायला मी नेहमीच भाग पाडत आलो. मी तिच्याशी आणि आमच्या मुलांप्रती निष्ठुर राहिलो. पण ती तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहिली. ती खरी संत आहे, मी नव्हे.” त्यांनी गांधीजींच्या बाहूत आपले प्राण सोडले, त्यावेळी त्यांनी ही कबुली दिली होती.
ते अहिंसा आणि प्राण्यांबद्दल करुणेचे खंदे पुरस्कर्ते होते. एकदा त्यांनी बघितले की एका गायीच्या आचळातून अगदी रक्त निघेपर्यंत तीव्रतेने दुध काढले जातेय. त्या दिवसापासून त्यांनी गाईचे दुध सोडले आणि केवळ बकरीचे दुध घेऊ लागले. ते म्हणायचे की गाईच्या दुधावर पहिला अधिकार तिच्या वासराचा असतो. ते गायींप्रती इतके संवेदनशील होते आणि आज, भारत गाईंचे मांस निर्यात करण्यात जगात नंबर एक वर आहे. गेल्या काही वर्षांत ह्या देशात लाखो गाईंची कत्तल केली गेलीय. ते मद्याचा निषेध करण्याबाबत मुख्य समर्थक होते, पण कोणीही त्याचा उल्लेख करीत नाहीत. ते धर्मांतर करण्याच्या विरोधात भक्कमपणे उभे होते पण कोणीही त्याबाबत बोलत नाहीत. महात्मा गांधी ज्या ज्या गोष्टींसाठी प्रयत्नरत होते ते त्यांच्याच देशात पूर्णपणे नष्ट केले जात आहे, हे अतिशय यातनादायी आहे.
आपल्या देशातील युवावर्गाने जागृत होत, ह्या प्रचंड सामर्थ्य असलेल्या मूल्यांना अंगिकारले पाहिजे. ते रोज सत्संग करीत असत. वास्तवात, हेच कारण होते ज्यामुळे त्यांचे आंदोलन सर्व लोकांपर्यंत पोहोचले आणि यशस्वी झाले. त्यांच्या सत्संगामुळे हजारो लोक एकत्र आले आणि त्यांच्या कार्याला पाठींबा देत एकसंध राहिले.
आज गांधीजींच्या काळात होती तशीच गंभीर परिस्थिती आली आहे. आपण पुन्हा परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहोत आणि आपल्याला आपल्या देशाच्या उज्वल भवितव्याच्या विशाल दृष्टीकोनातून एकत्र यायचे आहे. आपण सारे आपला भारत देश अधिक चांगला बनविण्याची जबाबदारी घेऊया आणि महात्मा गांधींसारखीच आशा आणि उत्साहाची लाट निर्माण करूया.