भारतीय अध्यात्म मदर तेरेसांची मदत करू शकले असते काय? | Could Indian spirituality have helped Mother Teresa?

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

मदर तेरेसांनी भारतासाठी अलौकिक सेवा कार्य केले आहे. भारतवर्षाच्या अद्वितीय अध्यात्मिक संपदाचा त्यांना लाभ होऊ शकला असता काय? होय नक्कीच!

मदर तेरेसांनी आपले संपूर्ण जीवन संपन्न अध्यात्मिक परंपरा असणाऱ्या प्राचीन भूमीवर व्यतीत केले असले तरी त्या भारतीय अध्यात्मापासून दूर राहिल्या आणि त्यांनी स्वतःला अतिशय अलिप्त ठेवले. अध्यात्मिक साधकांना हे फारसे अवघड नव्हते की जेंव्हा त्या इतरांची सेवा करण्यात मग्न असायच्या तेंव्हा त्यांच्या आंतमध्ये काय चालले आहे इकडे लक्ष नसावे.

बरेच धार्मिक लोक अध्यात्मिक मार्गावर आहेत कां, हेच संशयास्पद आहे. अध्यात्मिक मार्गावर प्रवास करत असताना ज्या संघर्ष आणि वेदनेचा अनुभव येतो त्याला ना ते ओळखतात ना त्याला स्विकार करतात. मदर तेरेसा स्वतःशी इतक्या प्रामाणिक आणि निष्कपट होत्या की त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी अभिव्यक्त केला. अध्यात्मिक मार्गावर स्वतःसाठी प्रामाणिक असणे आणि स्वतःच्या आंतमध्ये काय चालले आहे ते ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे.

इतरांची सेवा करण्याने आपल्यातील ऊर्जा वाढते पण ती आपल्या आतील पीडेला कमी करत नाही. त्यासाठी आपणास आत्म्याचे गतिशास्त्र आणि त्यांचा सुख दुःखाशी असणाऱ्या संबंधाला जाणून घ्यावे लागते. हे ज्ञान उपनिषदे, योगवसिष्ठ, अष्टावक्र गीता आणि त्रिपुरा-रहस्य सारख्या भारतीय ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे.

मनातील शंका दूर करण्यास व जिज्ञासेची तहान भागवण्यासाठी वेदांतात असलेल्या ज्ञानाची चांगली मदत झाली असती. त्यांच्या पत्र व्यवहारातून वर्णन झालेल्या त्यांच्या सर्व अवस्थांचा उल्लेख महर्षी पातंजलीं यांनी सांगितले आहे ते योगामध्ये नऊ प्रकारचे अडथळे येतात.

व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरति, भ्रन्तिदर्शन, अलब्धभूमिकत्व आणि अनवस्थितत्व – या नऊ अडथळ्यांचा सामना करण्यासाठी महर्षी पातंजलींनी सांगितलेल्या सिद्धांतांचा लाभ मदर तेरेसांना खूप होऊ शकला असता.

अध्यात्मिक विज्ञानाच्या ज्ञानाच्या अभावामुळे मदर तेरेसा चेतनेच्या त्या अवस्थांच्या त्रासातून गेल्यात, असे दिसते. हे मलेरिया ग्रस्त रुग्णासारखे झाले ज्याला मलेरियाच्या औषधाबाबतीत काहीही माहित नाही.

मदर तेरेसांना जाव्या लागलेल्या अनुभवातून श्रीरामासहित इतर धर्मांच्या संतांना आणि प्रबुध्द व्यक्तींना या पीडेतून जावे लागले. याबाबतीत श्रीरामांना महर्षी वसिष्ठांचे मार्गदर्शन ‘योग-वसिष्ठ’ च्या रूपातून झाले. ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की ज्या व्यक्तीला समाधीचा अनुभव असेल तीच व्यक्ती इतरांना त्यांच्या अध्यात्मिक पीडा आणि क्लेश या पलीकडे जाण्यास सहाय्य करू शकते.

जेव्हा आपल्या पारंपरिक धारणा आपल्याला त्यांच्या पलीकडे पाहण्यापासून रोखतात तेव्हा त्या धारणाच आपल्या अध्यात्मिक प्रवासात अडथळा बनतात.

अध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीचे मन खुले असणे आणि त्याचवेळी त्याला परंपरांचा आदर असणे गरजेचे असते. धर्माच्या पलीकडे असणारी अध्यात्मिकता व्यक्तीचा एकटेपणा, एकांत आणि भकासपणा दूर होण्यास मदत करते. याला त्या व्यक्तीने आपल्या धर्माबाबतीत आणि पंथाशी प्रतारणा करणे असे समजण्याची आवश्यकता नाही.

योग आणि ध्यान प्रक्रिया कोणत्याही धार्मिक विश्वासाच्या विरोधी नाहीत. फादर बेडे ग्रिफिथचे उदाहरण घ्या जे भारतात आले आणि त्रिचीमध्ये योग आणि वेदांत तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. या ज्ञानामुळे त्यांना आध्यात्मिक मार्गावरील येणारे अडथळे पार करण्यास मदत झाली आणि असे असतानाही त्यांची ख्रिस्ती धर्मावरील निष्ठा अबाधित राहिली.

धर्मनिष्ठ असल्याने मदर तेरेसांना असे वाटले असावे की आपल्या दुविधांचे उत्तर भारतीय अध्यात्मात शोधल्यास येशू प्रति प्रतारणा ठरेल. अध्यात्मिक मार्गावर जर काही बाधा येत असतील तर एका जिज्ञासूला आपले लक्ष्य समोर ठेऊन, त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही पर्यायी मार्ग शोधावे लागतील.

जेंव्हा आपण ईश्वराला एक प्रत्यक्ष / आकलनीय वस्तू समजतो तेंव्हा आपण पूर्णपणे भरकटतो आणि दुःखी होतो. दृश्यापासून दृष्ट्यापर्यंतचा आणि प्रत्यक्ष पासून प्रत्यक्षदर्शी पर्यंतचा चेतनेत होणाऱ्या स्थित्यंतरामुळे बरीच अध्यात्मिक प्रगती होते. यामुळे आनंद, जो चेतनेचा मूळ स्वभाव आहे त्याचा उदय होतो. आणि वेदान्ताच्या सूत्रांचा अनुभव घेतल्याने आपल्या समजुतीतील सर्व अडथळे, मानसिक विरोध आणि पूर्वापार बौद्धिकतेवर असलेला पगडा सहजच ओलांडता येतो.

लोकांच्या विचारांमध्ये व्यापकता नाही हे दुर्दैव आहे. मदर तेरेसांना या आंतरिक त्रास आणि अंधकारातून बाहेर पडण्यासाठी प्राणायाम आणि ध्यानाच्या काही सत्रांचा लाभ झाला असता याची मला खात्री आहे. अध्यात्मिक मार्गावर हजारो जिज्ञासूंना या अवस्थेचा अनुभव येतो परंतू ते जेंव्हा ध्यान करू लागतात तेंव्हा ते यातून बाहेर पडतात.

भारतीय तत्त्वज्ञानात तीन प्रकारचे क्लेश नमूद केले आहेत, शारिरीक, मानसिक आणि अध्यात्मिक. अध्यात्मिक यातना सर्वात त्रासदायक असतात. पीडा / यातना यांचा अनुभव मनाच्या स्तरावर असतो आणि मनाच्या पलीकडे जाणे, विचार रहित होणे हाच समाधीचा उद्देश होय. मन हे बंधन आणि मुक्ती दोन्हीचे कारण आहे. जोपर्यंत आपण आपल्या मनाला शांत करत नाही तोपर्यंत आंतरिक शांती मिळणे असंभव आहे.

योग साधनेद्वारेच मनाला जिंकणे शक्य आहे. योग म्हणजे निव्वळ आसनेच नव्हेत तर प्राणायाम आणि ध्यान हे देखील योगाचे अभिन्न अंग आहेत. पातंजली योग दर्शन, आदि शंकरांचे दृगदृश्य विवेक, काश्मीर शैव मताचे विज्ञान भैरव तंत्र आणि संत तिरुमूल यांचे तिरूमंदिरम् तसेच इतर ग्रंथांमध्ये अध्यात्मिक पीडा आणि दुःखापासून मुक्ती मिळवण्याचे विविध उपाय सांगितले आहेत.

आयुर्वेद, योग आणि वेदांत हे क्रमशः मल, विक्षेप आणि आवरण नाहीसे करण्याचे उपाय आहेत. आयुर्वेद विचारांना शांत करण्यास मदत करतो तर प्राणायाम आणि ध्यान आपणास आंत गहन प्रसन्नता प्राप्त करण्यास मदत करतात.

प्रसन्नता म्हणजे आंतरिक दिव्यत्वाशी अनुसंधान जोडल्याचे चिन्ह आहे. जे तुमचे मूळ स्वरूप आहे, अश्या अनुपम चेतनेची अनुभूती वैदान्तिक क्रियांद्वारे होऊ शकते, जी आत्म्याच्या रुपामध्ये सदोदित आपल्या सोबत आहे आणि सतत सोबत असणार आहे.

वेदांताचा मूळ सिध्दांतच हा आहे की ज्याच्या शोधात तुम्ही आहात ते वायूप्रमाणे तुमच्या आसपासच पूर्वीपासूनच आहे. त्याला शोधण्यासाठी कोठे भटकायची गरज नाही तर निव्वळ त्याच्या अस्तित्वाप्रती सजग होण्याची गरज आहे. तसेच दिव्यत्व म्हणजे चैतन्य, आनंद आणि प्रेम जे मूळ तुमच्यामध्ये आहेच. निव्वळ हे ओळखण्याची गरज आहे.

वैज्ञानिक मनोवृत्ती आणि वैदातींक ज्ञान एकसाथ मिळाल्यास पूर्णत्व प्राप्त होते आणि आंतरिक स्थिरता मिळते आणि हेच भारतीय अध्यात्माचे सार आहे. टीकाकार बहुतेकवेळा विचारतात की जर वंचित लोकांची काळजी नाही घेतली गेली तर अध्यात्माचा काय उपयोग? त्यांच्या हे ध्यानात येत नाही की जेथे यथार्थ अध्यात्म असते तेथे सेवा हा घटक आपणहून येतोच.

चेतनेच्या क्षेत्रामध्ये जो जे पेरतो तेच फल त्याला प्राप्त होते. तुम्ही जर असा विचार करत असाल कि ईश्वर हा पिडा प्राप्त होण्याचे प्रमुख साधन आहे तर तुम्ही पिडा आकर्षित कराल. जर पीडेचे बीज पेरले तर तेच प्राप्त होईल नां. जिज्ञासूला ध्यान आणि समाधीच्या अनुभवाचा अभाव निरुत्साही आणि उदास बनऊ शकतो. यापासून बचावण्यासाठी आपल्याला स्वर्ग आणि नरक यांच्या बाबतीत असलेल्या संकल्पना बदलाव्या लागतील, सर्वव्यापक चेतनेबाबतीतील आपल्या समजुती बदलाव्या लागतील. आणि हा बदल निव्वळ अध्यात्म घडवू शकते.

पूर्वेकडील तत्त्वज्ञानानुसार अनुभव प्रथम येतो आणि मग विश्वास बसतो तर पश्चिमेकडील विचारधारांमध्ये विश्वास पहिला येतो, मग अनुभव.  मदर टेरेसाचा विश्वास होता पण त्या अनुभवासाठी झगडत होत्या. आणि त्या उलट अध्यात्मिक अनुभव आल्याने निरीश्वरवादी विवेकानंदांना स्वामी बनवले. विडम्बना अशी, कि कलकत्ता शहर हे या एकाच शतकात दोन्ही गोष्टींचे साक्षीदार ठरले.

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>