सिंहावलोकन आणि भविष्याचा वेध । Looking back, looking ahead

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

आनंद हा आपल्या चेतनेचा मूळ स्वभाव असल्यामुळे उत्सव साजरा करण्यासाठी कोणतेही कारण पुरेसे असते. नववर्षाची वेळ अशी आहे की जेव्हा संपूर्ण जगाला उत्सवाच्या वातावरणाने व्यापून टाकलेले असते. सरलेल्या वर्षावर एक नजर टाकत त्यातून आपण काय धडा घेतला ह्याची नोंद घेण्याची ही एक संधी असते. आयुष्यात गोष्टी शिकायच्या आणि विसरायच्या असतात. शिकणे अशासाठी की परत तीच चूक आपल्या कडून घडू नये आणि विसरणे ह्यासाठी की त्यामुळे आपल्या मनावर काही आघात होऊ नये.

‘निर्भया’ च्या दुर्घटनेची दुःखद नोंद घेतच आपण वर्षाची सुरुवात केली. देशभरात अविश्वासाचे आणि संतापाचे वातावरण होते. ह्यावर्षी नैसर्गिक आणि मानव निर्मित दुर्घटना घडलेल्या असल्या तरी काही सकारात्मक बाबी सुद्धा होत्या. बऱ्याच लोकांनी विचार केला की दोन वर्षांपूर्वी देशात भ्रष्टाचाराविरुद्ध जी लाट उसळली होती ती मुद्दा हरवल्याप्रमाणे विरून गेली. पण ती लाट अजूनही टिकून आहे आणि अजून चांगल्या भारताच्या उभारणीसाठी एकत्रित संकल्प म्हणून तयार आहे. ह्याचे श्रेय आपल्या देशाच्या युवावर्गाकडे जाते. जे लोकपाल बिल पास झाले ते परिपूर्ण नसले तरी ते योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. गेल्या महिन्यात विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली हे सुद्धा उत्साहवर्धक चिन्ह आहे, आणि आपण एक राष्ट्र म्हणून जागृत झालो आहोत हेच दर्शविते आहे. मात्र त्याच वेळी अजून बरेच काही करणे गरजेचे आहे. आता लगेचच हाती घ्यायचा उपक्रम म्हणजे आपल्या आजूबाजूचा प्रत्येकाचे नाव २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नोंदविले आहे की नाही हे सुनिश्चित करणे.

लोक मला नेहमीच विचारतात की मी भविष्याकडे कसा बघतोय. मी त्यांना सांगतो की भविष्य त्यांना जसे हवेय तसे घडविण्यासाठी आहे. अज्ञानी व्यक्ती भूतकाळाबद्दल खेद व्यक्त करीत असतो, भविष्याकडे नियती म्हणून बघतो आणि वर्तमानात हवालदिल राहतो. ज्ञानी व्यक्ती भूतकाळाकडे नियती म्हणून बघतात, भविष्यकाळ स्वेच्छेनुसार घडवतात आणि वर्तमानात प्रसन्न राहतात.

सरल्या वर्षातील घटना त्या त्या वेळेला कितीही महत्वाच्या असल्या तरी, जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा, त्या केवळ आपल्याला पडलेल्या स्वप्नासारख्याच असतात. त्या घटनांकडे नजर टाकली तर त्या सर्वांचे अस्थायी स्वरूप दिसून येते. घटना ह्या नदीतील दगड-धोंड्यांसारख्या आहेत. वाटेत दगड-धोंडे असले तरी नदी सतत वाहतच असते.

जसे आपण घटना आणि परिस्थितीच्या बाह्य जगतात जगत असतो, तसेच आपण जाणिवा आणि भावनांच्या आंतरिक दुनियेत ही जगत असतो, ज्याबद्दल आपण नेहमीच सजग नसतो. आपल्या मनावर उमटलेले आणि आपल्याला खिन्न करणारे भूतकाळाचे ठसे पुसण्याकरिता ध्यान हे सर्वात उत्तम साधन आहे. आपल्या बाह्य आणि आंतरिक जगतातील अंतर हे फक्त निमिषमात्र आहे.

बाह्य जगतात कार्यरत असताना आंतरिक जगताबाबत सजगता ठेवण्याचे कौशल्य म्हणजे योग आहे. जेव्हा तुम्ही बाह्य जगतात हरवून जाता तेव्हा आंतरिक जगतातील ताळमेळ बिघडतो आणि आयुष्य जणू संघर्ष बनते. जेव्हा तुम्ही आंतरिक जगतात स्थिर असता तेव्हा बाह्य जगतात स्पष्टता येते आणि आयुष्य खेळासारखे वाटू लागते.

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>