धर्मांधता : तर्कसंगत की तर्कविसंगत | Fanaticism: Rational or Irrational

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

जीवन अगाध आहे. परंतु लोक आपापल्या विविध दृष्टीकोनांद्वारे जीवनाची गहनता मोजण्याचा प्रयत्न करतात. इतक्या व्यापक स्वरूपातील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक वैविध्यपूर्ण जीवन भारताशिवाय अन्य कोठेही पाहायला मिळत नाही.

जेंव्हा सर्वांनाच घटनेने अभिव्यक्ति स्वातंत्र्य दिलेलं आहे, तेंव्हा मतभेद असणे स्वाभाविक आहे. पण मतभेदांना व्यक्त करण्याचा हिंसा हा मार्ग नव्हे. कोणीही आपली असहमती हिंसेद्वारे प्रकट करत असेल, तर त्याला भ्याडपणा म्हटलं पाहिजे. अलीकडेच धारवाडचे विख्यात विद्वान प्रो. एम. एम. कलबुर्गी यांनी मूर्तीपूजेच्या विरोधी आपले विचार प्रकट केले म्हणून त्यांची हत्या केली गेली. त्यांची हत्या निंदनीय आहे आणि यामुळे निव्वळ कर्नाटक राज्याचीच नव्हे तर समस्त तत्वज्ञान प्रेमींची हानी झाली आहे. ज्यांनी त्यांची हत्या केली, ते लोक आय.एस.आय.एस ISIS सारख्या कुख्यात अतिरेकी संघटनेपेक्षा वेगळे नाहीत.

 

आपल्या देशामध्ये विविध दृष्टिकोनांचे पूर्वापार स्वागत केले जात आहे. आणि यामुळेच आपल्या संस्कृतीला एक वेगळी समृध्दी प्राप्त झाली आहे. भक्ती सूत्र विविध संतांच्या विचारांना प्रदर्शित करते आणि प्रत्येकाचा आदर देखील केला जातो. समाज ज्यापध्दतीने असहमती आणि संघर्षावर मार्ग काढतो, त्यावरून त्या समाजातील सुशीलता किंवा सभ्यतेची ओळख होते. आज काल दूरदर्शनवर दाखवल्या जाणाऱ्या वाद विवादापेक्षा पूर्णपणे विपरीत, आदि शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांच्यामधील जगप्रसिध्द वाद-विवाद एकदम विपरीत मापदंडाने, पुष्पहारांचा वापर करून केला गेला.

 

सत्य इतके विशाल असते की फक्त एका दिशेने त्याचे अवलोकन करणे शक्य नसते. त्याच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन परस्पर विरोधी असू शकतात. भगवद्गीता तर विराधाभासांनी भरली आहे. म्हणून बुध्दिवान लोक वेगवेगळ्या विचारांचे असले तरी एका तत्त्वावर एकत्र येतात आणि ते म्हणजे “कदाचित” (कदाचित असे असू शकेल) जितके जास्त आपण जाणू लागतो तितके जास्त आपणास अनुभूती होऊ लागते की आपण काहीच जाणत नाही.

 

प्रत्येकाला जसे हवे तसे अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे परंतु आपल्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामुळे इतर लोकांच्या भावना दुखवणे योग्य नाही. एक जुनी संस्कृत म्हण आहे-

 

“सत्यम् ब्रूयात् प्रियम् ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम्।

प्रियम् नानृतं ब्रूयात् एष: धर्मः सनातनः ।।”

 

अर्थात- ‘सुखकर वाणीमध्ये सत्य बोला. इतरांना अप्रिय वाटेल असे सत्य आणि इतरांना सुखकर वाटेल असे असत्य बोलू नका. असे आचरण म्हणजेच सनातन धर्म आहे.’

 

खरेतर ईश्वर निराकार आहे पण जर कोणाला ईश्वराला मूर्ती रुपात पाहून आनंद मिळत असेल तर त्यात काही वाईट नाही. देवात्वाशी असलेला भाव महत्वाचा आहे. जर कोणी एखाद्या विशेष रुपामध्ये तसेच मूर्तीमध्ये भावपूर्ण संबंधाचा अनुभव करत असेल तर त्याच्यावर टीका करणे योग्य नाही. एका तर्कसंगत दृष्टीकोनानुसार मूर्तिपूजा आणि पूजा-पाठ करण्यात काहीही अर्थ नसला तरी बऱ्याच जणांसाठी तो त्यांच्या आत्म्याच्या उत्थानाचा मार्ग आहे. साक्षात मूर्तीत नाहीच तर, भक्ताच्या हृदयात मूर्ती मुळे निर्माण होणाऱ्या भावनांतच देवत्व वास्तव्य करते. समजूतदारपणा आणि प्राप्तीच्या प्रत्येक स्तरावर असे लोक आहेत आणि आपल्या प्राचीन संस्कृतीचे मोठेपण यात आहे की प्रत्येकजण, ज्या स्थरावर आहेत त्यांचा समावेश ही संस्कृती करते.

 

काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याबाबतीत संकुचित मानसिकता असणे म्हणजेच धर्मांधता होय. अगदी तर्कसंगत विचारदेखील खोलीत बंद केले तर ते देखील धर्मांधतेकडे घेऊन जातात आणि तर्कहीन विचार जर ते मुक्त आणि निष्कपट असतील तर ते सत्याकडे घेऊन जातात.

[हा लेख ७ सप्टेंबर, २०१५ ला आई बी एन लाईव ऑनलाईन पोर्टल वर प्रकाशित झाला आहे: http://tinyurl.com/obca28e]

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>