न्याय व्यवस्थेला न्याय द्या | Being Judicious Judicially

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

एक काळ असा होता की न्यायव्यवस्था पिडीत लोकांसाठी आधाराचे कारण / माध्यम, निराश लोकांसाठी आशेचा किरण, गैरकृत्य करणाऱ्यांसाठी भीतीचे कारण आणि कायद्याचे पालन करणाऱ्यांसाठी आधारस्थान असे. बुद्धिमान आणि संवेदनशील लोकांसाठी घरासारखी होती. एक असे आधारस्थान होते जेथे गरीब आणि श्रीमंत दोघांनाही सहजपणे न्याय मिळत असे आणि न्यायाधीशाच्या खुर्चीवर स्थानापन्न व्यक्तीसाठी ते एक सन्मानाचे आणि अभिमानाचे पद होते. परंतु आजकाल गरीब व्यक्ती न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत, दुष्ट व्यक्ती तिची पर्वा करत नाहीत, चलाख व्यक्तींनी तिची चेष्टा बनवून ठेवली आहे आणि कायद्याचे पालन करणारेच तिला घाबरतात.आज परिस्थिती अशी आहे कि धूर्त व्यक्ती न्यायालयांचा दुरुपयोग करून समाजातील सन्माननीय व्यक्तींच्या विरुध्द हत्याराप्रमाणे वापरत आहेत. त्यांच्या विरुध्द खरी वा खोटी केस दाखल करायची मग ती व्यक्तीला सर्व आयुष्य स्वतःला निर्दोष सिध्द करण्यात घालवावे लागते.पूर्वीच्या काळी तुम्हाला तोपर्यंत निर्दोष मानले जायचे जोपर्यंत तुमच्यावर गुन्हा सिध्द होत नसे. परंतू आत्ता अशी परिस्थिती आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःला निर्दोष सिध्द करत नाही तोपर्यंत तुम्ही दोषी आहात असे मानले जाते. आणि आपण निर्दोष आहोत हे सिध्द करण्याची प्रक्रिया खूपच दिर्घकालीन आणि खर्चिक बनली आहे.

तुम्ही काही केलेले असो वा नसो, तुमच्यावरील आरोपच तुमच्या प्रतिष्ठेच्या चिंधड्या उडवतात. काँची शंकराचार्यांचेच उदाहरण घ्या. दिवाळीच्या दिवशी झालेल्या त्यांच्या अटकेला अगदी भडकरित्या प्रसारित केले गेले. तब्बल नऊ वर्षाच्या दिर्घ कालावधीने त्यांची निर्दोष मुक्तता झाली, परंतू त्यांच्या निर्दोषत्वाची बातमी कोणीही दिली नाही. अशारीतीने सन्मानित व्यक्तींची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग एक हत्यार म्हणून केला जात आहे. कोणाही प्रसिध्द व्यक्तीच्या विरोधात केस करून मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या लालसेपोटी या व्यवस्थेचा दुरुपयोग केला जात आहे.

भारताच्या पूर्व मुख्य न्यायाधीशांच्या म्हणण्यानुसार खुद्द राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे पालन करत नाहीत. जर सरकार स्वतः सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करत नसेल तर सर्वसाधारण व्यक्ती त्यांचे पालन करायला कसा उद्युक्त होईल?

या सर्व गोष्टींमध्ये ही सारी न्याय प्रक्रिया पक्षपाती असण्याची भीती वाटत राहते. सध्या परिस्थिती अशी आहे की हे साऱ्या गुण दोषांबरोबरच चालणारी संपूर्ण केस न्यायाधीशांच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे न्यायाधीशांची वकिलांशी असणाऱ्या खाजगी संबंधाची उघड उघड चर्चा होत आहे की कोणता वकील कोणत्या न्यायाधीशांच्या जवळचा आहे. या दुर्दैवी परिस्थितीमुळे न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळाले आहे, ज्यामुळे या व्यवस्थेवरील विश्वास कमी झाला आहे. असे असले तरी भारतात जगातील महान न्यायाधीश देखील निर्माण झाले आहेत जे सत्यनिष्ठ, बुध्दीवादी, स्पष्ट विचार आणि दया भाव यांचे प्रतिक आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगचे सौभाग्य आहे की येथील बोर्डाचे ट्रस्टी असे प्रख्यात न्यायाधीश आहेत, उदा. न्यायाधीश वी.आर.कृष्णा अय्यर, न्यायाधीश पी.एन.भगवती इत्यादी.

वस्तुस्थिती ही देखील आहे की आज न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात दावे प्रलंबित आहेत, ज्यामुळे लोक त्रस्त आहेत. विनाकारण विलंबानंतर मिळणारा न्याय हा देखील अन्यायच होय. परिणामतः चांगले लोक कोणत्याही कारणासाठी न्यायालयाची पायरी चढायला घाबरतात. अतोनात खर्च होणारा पैसा आणि प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियामुळे लोक अन्य मार्गांनी वाद मिटवणे पसंत करतात. मग त्यासाठी आपले कायदेशीर हक्क सोडावे लागले तरी हरकत नाही.

सध्या आपली न्यायव्यवस्था आपल्या प्रगतीमध्ये अडसर बनते आहे आणि प्रामाणिक लोकांच्या चारित्र्यावर डाग लावत आहे. भारताचे माननीय प्रधान न्यायाधीश याचे एक कारण सांगतात की न्यायाधीशांची कमतरता. सरकारने या समस्येवर तोडगा काढला पाहिजे तसेच आपल्या न्यायव्यवस्थेला भक्कम, सशक्त बनवले पाहिजे. तसेच न्याय व्यवस्थेने देखील आत्मचिंतन केले पाहिजे की तिची लोकांच्या मनातील भ्रष्टाचार मुक्त छबी निर्माण करण्यात ते यशस्वी होते आहे की नाही.

आज भारताला आपल्या न्यायव्यवस्थेवर गर्व आहे. मात्र आपली प्रसार माध्यमे अधिक स्वतंत्र आहेत. म्हणून अश्या काही घटना पहावयास मिळतात कि ज्यामध्ये न्यायव्यवस्था, वस्तुस्थिती ऐवजी जनतेच्या मतांबाबत अधिक चिंतीत आहे. प्रसार माध्यमे अप्रत्यक्षरीत्या न्यायव्यवस्थेवर प्रभाव टाकत आहेत. एखादी गोष्ट न्यायालीन तथ्यानुसार योग्य असली तरी तिला अत्यंत वेगळ्याच प्रकारे प्रस्तुत केले गेलेले असते. अश्यावेळी कोणीही लोकमताच्या विरूध्द जाऊ इच्छित नाही. त्याशिवाय न्याय व्यवस्थेतील नियुक्त्या, वशिले, बढत्या इत्यादी सर्व राजकीय दृष्टीकोनातून होत असते. राजकारण, अर्थकारण, न्यायव्यवस्था, प्रसार माध्यमे आणि जनता या सर्वांमध्ये परिस्थिती खूप विचित्र बनली आहे.

इतक्या विचित्र परिस्थितीवर तोडगा निघणे महा कठीण आहे. कारण यासाठी विविध स्तरांवर सुधारणा होणे गरजेचे आहे. आणि या सर्वासाठी एका अत्यंत जागृत, सजग समाजाची, जनमानसाची आवश्यकता आहे.

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>