पूर्णत्वाचा एक भाग | A Part of the Whole

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

“प्रत्येक घटनेमागे ज्ञान आहे.

प्रत्येक व्यक्तीमागे प्रेम आहे.

प्रत्येक वस्तूमागे अनंतता आहे.”

 

विश्व सांस्कृतिक महोत्सवाच्या केवळ एक महिना अगोदर, पुण्यात एका कार्यक्रमावरून परतताना गाडी चालविणारा तरुण आयोजक मला म्हणाला, ”सारे काही किती सुरळीतपणे पार पडले.” मी त्यावर गंमतीने म्हणालो, “अरे, मला वाटत होते माझी गाडी कुणी ज्येष्ठ नागरिक नाही तर तरुण व्यक्ती चालवतोय, ज्याला आव्हानांचा सामना करायला आवडते.” मग मी सहजतेने सूचित केले की, आव्हाने नव्हती तर ते अतिशय कंटाळवाणे झाले असेल. यावर गाडीतले सर्वजण खळखळून हसले.

 

आणि त्यानंतर आव्हानांनी भरगच्च असा विश्व सांस्कृतिक महोत्सव (WCF) आला !

 

महोत्सवासाठी जगभरातून सामील होणाऱ्या लोकांना सामावून घेऊ शकेल अशी योग्य जागा दिल्लीमध्ये शोधणे हे खरोखरच आव्हानात्मक होते, कारण त्यातले बहुतांश पर्याय इतर सुविधांपासून फारच लांब होते किंवा तिथे पोहोचणे एवढे सोपे नव्हते. या अगोदर जर्मनीत झालेल्या WCF मध्ये ही समस्या उद्भवली नव्हती कारण ते बर्लिनच्या शहराच्या अगदी मध्यभागी आयोजित केले होते.

 

या महोत्सवाला जगभरातून मिळालेला प्रतिसाद इतका प्रचंड होता की केवळ आपले दिल्लीचेच स्वयंसेवक सामावण्यासाठी कोणतेही स्टेडियम अपुरे पडले असते. म्हणून आम्ही दिल्ली विकास प्राधिकरणाकडे (DDA) गेलो आणि त्यांनी आम्हाला यमुना नदीच्या किनाऱ्यावरची जागा वापरायला परवानगी दिली. ती जागा कचरा, दगडधोंडे आणि दुर्गंधीने भरलेली होती. आम्हाला कल्पना होती की ती जागा या महोत्सवासाठी तयार करणे कठीण कार्य होते तरी आम्ही त्या जागेचीच निवड केली, कारण आम्हाला वाटले की त्या निमित्ताने तरी दोन्ही राज्य आणि केंद्र सरकार तत्परतेने यमुना नदी स्वच्छ करतील. भारतात दबाव आल्यावर कामे चांगली होतात.

 

आणि गंमत सुरू झाली !

महोत्सवाला केवळ एक महिना उरलेला असताना, जेंव्हा कार्यक्रमाचा मंच जवळपास तयार झाला होता, सर्वांना निमंत्रणे पोहोचली होती आणि त्यावेळी काही कार्यकर्ते यमुना नदीच्या पूर क्षेत्राची हानी होत आहे हा आरोप करून महोत्सवाचे ठिकाण बदलायला सांगू लागले आणि त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) कडे तशी तक्रार दाखल केली. तक्रारदाराचा आव असा होता की तो देवदूत आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग गुन्हेगार आहे. ही अशी प्रवृत्ती दिशाभूल करणारी ठरू शकते. यामागचा हेतू शोधून त्याची दुरुस्ती करणे गरजेचे असते. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सातत्याने झटणाऱ्या संघटनेलाच अशा प्रकारे अपराधी म्हणून दर्शविले गेले आणि ज्या लोकांनी आमच्या विरोधात तक्रार केली त्यांना पर्यावरण संरक्षणाबद्दल कोणतीही पार्श्वभूमी नव्हती.

 

NGT समितीने वैज्ञानिक स्तरावर कसलेही मूल्यमापन न करता केवळ परिकल्पित निष्कर्ष काढला की ह्या उत्सवामुळे यमुनेच्या किनाऱ्यावरील जागेचे १२० करोड रुपयांचे नुकसान होऊ शकते. तिथे स्टेज बांधले जात असतानाच त्या मैदानावर केवळ एक तासभर चक्कर मारून समिती एवढ्या प्रचंड आकड्याप्रत पोचली होती.

 

आम्ही आवश्यक त्या साऱ्या रीतसर परवानग्या घेतल्या असताना आणि मार्गदर्शक तत्वे पाळलेली असतानांही, नंतर NGT समितीने आमच्यावर पाच करोड रुपयांची नुकसान भरपाई थोपली.(ज्याचा प्रसार माध्यमांनी दंड असा अर्थ काढला). हे पुर्णतः अन्यायकारक आहे. हे तर हिरवा सिग्नल ओलांडला म्हणून चलान करण्यासारखेच होते. गंगा, यमुना आणि इतर नद्यांत अगणित नाल्यांचे घाण पाणी मुक्तपणे सोडले जाते त्या तुलनेत केवळ तीन दिवसांच्या कार्यक्रमाने असे कितीसे नुकसान झाले असते? जे उघडउघड पर्यावरण प्रदूषित करित आहेत त्यांच्या बद्दल हे कार्यकर्ते काय करत आहेत? विश्व सांस्कृतिक महोत्सवाच्या तोंडावर NGT चा अंतरिम आदेश पोचल्याने आमची चांगलीच कोंडी झाली होती.

 

त्याच नदीच्या काठावर कित्येक पक्की बांधकामे झाली होती, तिकडे डोळेझाक करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मात्र ह्या कार्यक्रमात अडथळे आणण्यासाठी खूप उत्साह दाखवला. आर्ट ऑफ लिव्हिंगला एकटे पाडत लक्ष्य केले जात आहे हे मात्र स्पष्ट दिसून येत होते. ह्यामागे त्यांचा काय हेतू होता?

 

अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्यास मी लोकांना प्रोत्साहित करीत आलो आहे आणि मीच शरणागती पत्करून अन्यायकारक निर्णय स्वीकारू शकत नव्हतो. हा पैशांचा प्रश्न नाही तर न्यायासाठी उभे ठाकण्याचा मुद्दा आहे. ह्या बाबतीत अखेरपर्यंत आमचा संघर्ष चालू राहील.

 

प्रसारमाध्यमांकडून परीक्षा

प्रसारमाध्यमांच्या काही विभागांनी ह्याबाबतीत आम्हाला खाली खेचण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. अगदी सूक्ष्म तपासणी करूनही ते काहीच चूक शोधू शकले नाहीत आणि त्यांचे घेतलेले आळ किती पोकळ आणि फुसके होते हेच त्यावरून सिद्ध झाले.

 

एका विशिष्ट राजकीय पक्षासोबत हितसंबंध असलेले एक इंग्रजी वर्तमानपत्र आर्ट ऑफ लिव्हिंगची बदनामी करण्यासाठी एवढे उतावीळ झाले की ते महोत्सवाच्या एक महिन्यापूर्वी निधन पावलेले संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सचिव जनरल ब्युट्रोस ब्युट्रोस घली ह्यांचा संदर्भ देत महोत्सवाच्या स्वागत समितीत सह अध्यक्ष म्हणून एक मेलेली व्यक्ती आहे असा ओरडा करू लागले. जगातल्या अति आदरणीय राजनीतिज्ञापैकी एक असलेल्या व्यक्तीबद्दल आपल्या साऱ्या सभ्यतेच्या आणि सदाचाराच्या संवेदना ते गमावून बसले होते. ह्याच वर्तमानपत्राने स्वयंसेवकांनी गोळा करून ठेवलेल्या आणि निचरा करणाऱ्या ट्रकची वाट पाहणाऱ्या कचऱ्याचे फोटो दाखवून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ द्वारे ‘आर्ट ऑफ लिटरिंग’ असे वर्णन सुद्धा केले.

 

लोकांना त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी केलेला त्यांचा अजेंडा हा किती पक्षपाती आणि नकारात्मक आहे हे लागला हे अगदी स्पष्टच झाले. एका वरिष्ठ पत्रकाराने इथपर्यंत लिहिले की आर्ट ऑफ लिव्हिंग दिल्लीच्या राजकिय धुमश्चक्रीत गोवले गेलेय, ज्यातून त्याला सूचित करायचे होते की खरे लक्ष्य हे सरकार होते.

 

कार्यातली कुशलता

ह्या सगळ्या आव्हानांमुळे आमच्या स्वयंसेवकांना आणि टीचर्सना सारे काही अतिशय कुशलतेने हाताळणे आवश्यक होते आणि त्यांनी ते मोठ्या आत्मविश्वासाने केले सुद्धा. ज्या खोट्या बातम्या पसरविल्या जात होत्या, त्याने बरेच दुखावले गेले होते पण त्यांनी ऐकलेल्या ज्ञानाच्या गोष्टी ते अमलात आणू लागले. इतके डिवचले गेल्यावर सुद्धा ते शांत राहिले आणि नकारात्मकता आणि क्रोधापासून स्वतःला दूर ठेवले. त्यातले काही जण आपल्या निखालस प्रामाणिकपणामुळे थोडे उद्धट वाटलेही असतील.

 

१३ मार्च २०१६ ला महोत्सवाची सांगता झाल्यावर मी आमच्या स्वयंसेवकांना एक दिवसाची विश्रांती घेऊन पुढच्या दिवसापासून स्वच्छता मोहीम हाती घ्यायला सांगितले. पण ते आपल्या कार्याप्रति असे वचनबद्ध होते की १४ तारखेला सकाळी आठ वाजताच सारे मैदानावर हजर झाले. आव्हानांमुळे आमच्या स्वयंसेवकांचा हिरमोड होण्याऐवजी त्यांच्यात अधिक उत्साहाचे स्फुरण चढले होते.

 

काही लोक म्हणतात की मोदीजी माझ्या जवळचे असल्याने मी शासनाकडून फायदा उचलला. ह्याचा अर्थ त्यांना मी किंवा मोदीजी कसे आहोत हेच माहीत नाही. मी जगभरात प्रवास करतोय पण गेल्या ३५ वर्षांत मी कुणाकडूनही झुकते माप मिळवण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही. त्याच वेळी मोदीजी कुणालाही झुकते माप देत नाहीत हे सर्वश्रुत आहे.

 

जेव्हा मी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधानांना भेटलो होतो तेव्हा त्यांना ह्या महोत्सवाचे उदघाटन करण्याची विनंती केली आणि यमुनेत घाण पाणी ओतणारे १७ नाले बंद करता येतील का ह्याची विचारणा केली, जेणेकरून तिथला घाण वास रोखता येईल. पण हे प्रकरण दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी त्याची असमर्थता दर्शविली. मी हाच प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल ह्यांनाही विचारला. त्यांनी आपल्या उपस्थितीची खात्री देतानाच हा घाण प्रवाह रोखण्यास कमीत कमी दोन वर्षे लागतील असे सांगितले.

 

आर्ट ऑफ लिव्हिंग ही अराजकीय संघटना असून तिथे नेहमीच सर्व पक्षाच्या लोकांचे स्वागत केले जाते. तथापि, काही पक्षांना आमच्या बद्दल आकस आहे असे वाटते. जेव्हा आम्हाला श्रीमती सोनिया गांधी आणि श्री राहुल गांधी यांना आमंत्रण द्यायचे होते, तेव्हा त्यांना व्यक्तीगतरित्या भेटणे केवळ अशक्य आहे हेच सिद्ध झाले. अखेर आमच्या ट्रस्टींना त्या आमंत्रणपत्रिका त्यांच्या ऑफिसमध्येच सोडून द्याव्या लागल्या. ह्या महोत्सवात बऱ्याच देशांचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सदस्य उपस्थित होते, मात्र भारतातल्याच काही पक्षांनी तिथे उपस्थित न होता आपली संकुचित मनोवृत्ती दर्शविली, तसेच जगभरातल्या लोकांशी संवाद साधण्याची संधीही गमावली. ह्या कार्यक्रमाचा फायदा त्यांनी पूर्णपणे सरकारलाच करून दिला हे त्यांना जाणवलेही नसेल. इतकेच काय, एक सुप्रसिद्ध धार्मिक नेता इतरांना ह्या कार्यक्रमाला हजर राहण्यापासून परावृत्त करण्यासाठी पडद्यामागून हालचाली करीत होता असेही कळून चुकले आहे.

 

अप्रत्यक्ष वरदान

अशी म्हणच आहे की – सर्व काही अप्रत्यक्ष वरदानच असते ! जर काहीच विवाद उद्भवला नसता, तर हा कार्यक्रम शांततेत विनासायास पार पडला असता. जरी अगदी पहिल्यांदाच आर्ट ऑफ लिव्हिंग विवादात ओढले गेले असले तरीही, त्यामुळे सर्व जनतेला ह्या महोत्सवाची माहिती तर झालीच, तसेच ह्या कार्यक्रमाला अनुकूल असलेल्या जनतेला आपल्या भावना व्यक्त करण्यास दारे उघडी झाली. जेव्हा टीव्ही चॅनल्सनी हा कार्यक्रम होऊ द्यावा की नाही ह्याबद्दल जनतेची मते मागवली तेव्हा सकारात्मक प्रतिसादाचे भरभरून बहुमत मिळाले.

 

सारे जग एकत्र आणण्याच्या आमच्या स्वप्नाचा एक भाग म्हणून सारे दूतावास आणि सगळ्या राज्यप्रमुखांना आमंत्रित केले होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे मोठ्या प्रमाणावर सभासद असलेल्या झिम्बाब्वे देशाचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे ह्यांनी आमचे आमंत्रण स्वीकारले आणि ते आपल्या मंत्रीमंडळाच्या ३७ सदस्यांसमवेत ह्या कार्यक्रमात उपस्थित राहणे अपेक्षित होते.

 

जेव्हा त्यांच्या कार्यालयाने ह्या महोत्सवाच्या सर्व तीनही दिवशी ते सहभागी होत असल्याची योजना घोषित करत हरारेत प्रेसनोट जारी केली तेव्हा त्याने वादळ तयार झाले. आमचे युरोप आणि अमेरिकेतील संयोजक हळूहळू आम्हाला फोन करू लागले कारण, बरेच मान्यवर लोक ज्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यास मान्यता दिली होती ते विचलित झाले होते आणि त्यातून माघार घेऊ लागले होते. WCF मध्ये सहभागी होणार होते असे जवळपास शंभर उच्चपदस्थ नेते आपली अस्वस्थता व्यक्त करू लागले. आता हा विश्व सांस्कृतिक महोत्सव असाच घटत जाऊन केवळ भारत आणि आफ्रिकेची शिखर परिषद म्हणून उरतो की काय असा धोका निर्माण झाला असता. अध्यक्ष मुगाबेसोबत मी व्यासपीठावर एकत्र येऊ नये असा सल्ला सुद्धा मला देण्यात आला होता, अर्थात याच्याशी मी सहमत नव्हतो. सर्वांनी एकत्र यावे असे असे आम्हाला वाटत असले तरी युरोप आणि अमेरिकेचा ह्याला इतका प्रखर विरोध होता की आमच्या आयोजकांना हे हाताळणे जड जाऊ लागले. आमची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती कारण अगदी वेळेवर एका देशाच्या प्रमुखाचे आमंत्रण रद्द करणे शक्य नव्हते.

 

जेव्हा भारताचे राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी ह्यांनी अभिनंदनपर संदेश पाठविला आणि सोबतच कार्यक्रमात उपस्थित होण्याची आपली असमर्थता दर्शविली तेव्हा ते आम्हाला एखादे वरदानच वाटले. आम्ही अध्यक्ष मुगाबेंच्या ऑफिसशी संपर्क साधला आणि त्यांना सूचित केले की यजमान देशाचे राष्ट्रपती ह्या कार्यक्रमाला हजर राहू शकत नसल्यामुळे योग्य तो प्रोटोकॉल राखणे आम्हाला शक्य होत नसल्याने त्यांनी इथे येणे योग्य राहणार नाही. त्यांनी तो दौरा रद्द करण्याचे ठरविले. हरारेतील भारतीय उच्चायुक्त आणि दिल्लीतील झिम्बाब्वेचे उच्चायुक्त ह्यांनी ह्या बाबतीत आम्हाला पाठींबा दिला.

 

ज्या प्रतिनिधींनी हा दौरा रद्द केला होता किंवा त्या मार्गावर होते त्यांनी परत आपली तिकिटे बुक केली. युरोप आणि अमेरिकेच्या ५० देशातील आमच्या आयोजकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

 

पुढे सुरु राहील …..

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>